अवकाळी पाऊसासह गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

शेती पिकासाठी हेक्टरी 50 हजार तर फळबागांसाठी हेक्टरी 1 लाख मदत करा 'एनडीव्हीएफ'च्या निकषाचा फेरविचार करावा, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी 

अवकाळी पाऊसासह गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा
टीम तालुका न्यूज  / 12-Apr-2023


मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच एप्रिल महिन्यातही सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार तर फळबागांसाठी हेक्टरी 1 लाख मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद आहे. यामुळे उन्हाळी  मूग, हरभरा, गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले.  कोकणात आंबा, काजू, कोकम, जांभूळ या पिकांना फटका बसला असून पश्चिम महाराष्ट्र, खांदेश, विदर्भात द्राक्ष, केळी व संत्रा या फळपिकांचेही नुकसान झाले आहे.


मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात पुन्हा गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. या गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले तर रब्बीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून पूर्णता गेले आहे. विदर्भात झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.  तसंच खरबूज , टरबूज, गहू, सूर्यफूल, आंबा, कांदा, पपई पिकांचं नुकसान झालं आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीसह राहाता आणि कोपरगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला.  कोपरगाव आणि राहाता शहरासह परिसरात गारपीट झाली.  काही ठिकाणी विजही कोसळली. या गारपीटीने कांदा, गहू, द्राक्ष यासह फळबागांच नुकसान झाल आहे.   नाशिक व बीड जिल्ह्याला 9 आणि 10 एप्रिल, 2023 अशा सलग दोन दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.


एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने  हजारो जनावरे तसेच घरांचेही नुकसान झाले आहे.   धुळे जिल्ह्यात शेतात गहू काढण्‍यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वर नागराज पाटील यांचा वीज  पडून मृत्यू झाला तर केवळबाई देवराम मोरे ही शेतकरी भगिनी गंभीर जखमी झाली.  बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातही एका शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.  बुलडाणा जिल्ह्यात पुंडलिक जगदेव माने व गोपाळ कवडे या मेंढपाळ व शेतकऱ्याचाही वीज पडून मृत्यू झाला.


दि.9 एप्रिल, 2023 ला अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पारस येथे बाबुजी महाराजांच्या यात्रेत महाआरतीदरम्यान वादळी पावसामुळे लिंबाचे झाड पडल्याने टिनशेडखाली दबून 6 जणांचा मृत्यू झाला.  या दुर्घटनेत सुमारे 50 ते 60 भाविक टिनशेडखाली अडकले होते.  त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.


राज्यात सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, उस्मानाबाद जिल्ह्यांत द्राक्षांखालील क्षेत्र साडेतीन लाख एकरच्या घरात आहे. आजघडीला राज्यभरातील सुमारे दहा हजार एकरावरील द्राक्षबागा अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत.   हंगाम अखेरच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  द्राक्षांबरोबरच बेदाणा निर्मितीलाही फटका बसला आहे.


सुमारे दोन लाख टन बेदाणानिर्मितीची होण्याची शक्यता होती. बेदाणानिर्मिती सुरू असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने बेदाणा काळा पडणे, गोडी कमी होणे व उतारा कमी येण्यामुळे नुकसान झालेले आहे.   निर्यातक्षम द्राक्षांचे प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांपर्यंतचे दर 20 ते 40 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत.  त्यामुळे द्राक्ष बागायतदार तसेच बेदाणा प्रक्रिया उद्योगांनाही मदतीचा हात सरकारने देण्याची आवश्यकता आहे.


राज्यात आठवड्याभरापासून अवकाळी व गारपिटीचे संकट आलेले असताना, शेतकरी उद्धवस्त झालेला असताना, अनेकांना मृत्यू ओढवला असताना राज्यसरकार गंभीर नाही,  मंत्रिमंडळातील एकही मंत्री महाराष्ट्रात नाही, हे चित्र महाराष्ट्राला शोभणारे नाही.


मार्च महिन्यातील अवकाळी व गारपीटग्रस्त क्षेत्राचे राहिलेले पंचनामे, पंचनाम्यातील त्रुटी, जिल्ह्याचे सर्वंकष प्रस्ताव शासनाला सादर करणे, ही कामे राहिलेली आहेत.  नव्याने एप्रिलमधील अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची आवश्यकता आहे.  शेतकरी मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत.


अशा परिस्थितीत 3 एप्रिल, 2023 पासून राज्यातील नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकारी बेमुदत संपावर गेले होते.  परिणामी राज्याच्या 358 तालुक्यात महसूल विभागाचे कामकाज 4 दिवस ठप्प झाले होते.  याचाही फार मोठा फटका नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजनांना बसला. पंचनाम्यांच्या कामांनाच सुरुवात झालेली नसल्यामुळे नुकसानभरपाईच्या घोषणेला आणखी किती काळ लागेल, हेही सांगता येत नाही.


विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून आम्ही विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी सरकारकडे करीत होतो.  पण पंचनामे झाल्याशिवाय मदत दिली जाणार नाही, ही ताठर भूमिका आजपर्यंत सरकारने सोडलेली नाही.   एकीकडे पंचनामे पूर्ण होत नाहीत आणि दुसरीकडे एकामागून एक नैसर्गिक आपत्तीची कुऱ्हाड शेतकऱ्यांवर बसत असताना सरकार तातडीची मदतही जाहीर करायला तयार नाही, अशी परिस्थितीत राज्यात निर्माण झालेली आहे.   मार्चमधील पंचनामे पूर्ण करण्यासाठी जवळ जवळ 1 महिन्यांचा काळ लागला.   मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार मार्चच्या आपत्तीतील शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले असून जिल्ह्यांचे प्रस्ताव सरकारकडे प्राप्त झालेले आहेत.  सर्व जिल्ह्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले असताना सरकारकडून मदतीबाबतचा निर्णय का होत नाही, असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे.  


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट